चणचण असली तरी सिंचन होणार, कारण ‘प्रति थेंब अधिक पीक’ या महत्त्वाकांक्षी सूक्ष्म सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणार आहे! राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ही योजना पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार पीक उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना मदत करत आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नात वाढ आणि आर्थिक सक्षमीकरणावर होणार आहे.
या योजनेचा सर्वात मोठा आणि आकर्षक लाभ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. या शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत (राष्ट्रीय कृषी विकास योजनेत २०% + इतर योजनांचा लाभ) अनुदानाचा मोठा आधार मिळणार आहे! याशिवाय, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५%, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५% अनुदान मिळते.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना किंवा बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत अतिरिक्त अनुदानाची तरतूद असल्याने शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी त्वरीत पाऊल उचलणे आवश्यक आहे. महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत घेता येईल. अर्ज करताना सातबारा, आधारकार्ड, आणि बँक पासबुक ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
पाण्याचा आणि खतांचा कार्यक्षम वापर झाल्यामुळे पीक उत्पादनाचा खर्च कमी होऊन नफा वाढेल. त्यामुळे, प्रत्येक शेतकऱ्याने या लाभदायी सरकारी योजनेचा उपयोग करून शेतीला समृद्धीची जोड द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
