गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे मेट्रो आता थेट आळंदीपर्यंत धावणार, भाविकांसाठी प्रवास होणार सुखकर!

पुणे मेट्रो आता थेट आळंदीपर्यंत धावणार, भाविकांसाठी प्रवास होणार सुखकर!

पुणे शहरातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीपर्यंत लवकरच मेट्रो धावणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोहगाव मेट्रो मार्ग आळंदीपर्यंत वाढवण्यासाठी महामेट्रोला प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आळंदी हे वारकरी संप्रदायाचे मोठे श्रद्धास्थान असून, या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागातील लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रविवारी विश्रांतवाडी येथील खासदार जनसंपर्क सेवा अभियानात बोलताना मोहोळ यांनी अनेक स्थानिक प्रश्नांवरही लक्ष केंद्रित केले. लोहगाव आणि धानोरी परिसरातील नागरिकांनी डीपीआर, रस्ते, आणि संरक्षण विभागाच्या ९०० मीटर व १०० मीटर परिसरातील बांधकामांच्या परवानग्यांसंदर्भात अनेक तक्रारी मांडल्या. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याव्यतिरिक्त, पुणे विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले

या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, सेवा अभियानापेक्षा महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची गर्दी आणि बॅनरबाजी अधिक प्रमाणात दिसली. यावर बोलताना मोहोळ यांनी, भाजप हा २४ तास काम करणारा पक्ष आहे आणि हे फलक जनतेच्या समस्या मांडण्यासाठी लावण्यात आल्याचे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version