गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पोलिसांनी थांबवला पुण्यात रंगलेला सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या म्युझिकल शो.

पोलिसांनी थांबवला पुण्यात रंगलेला सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या म्युझिकल शो.

पुणे १ मे २०२३ : पुण्यात रविवारी रात्री, राजाबहाद्दूर मिल परिसरात सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या म्युझिकल शो चे आयोजन करण्यात आले होते. या म्युझिकल शो ची रसिकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे हजारो रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, रात्री उशिरा पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रहमान यांना हा शो बंद करावा लागला.

आपल्या संगीताने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या,ऑस्करपर्यंत धाव घेणाऱ्या, सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानचा पुण्यातला शो वेळेचे कारण सांगून पोलिसांनी बंद पाडल्यामुळे पुणेकर रसिकांचा चांगलाच हिरमोड झाला.

पुणे, मुंबई सह राज्यातून अनेक जण या कार्यक्रमाला आलेले. शो एकदम रंगात आलेला. टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस सुरू होता. अनेकांनी रहमान यांच्या गीतावर ताल धरलेला. परंतु रहमान यांचा कार्यक्रम रात्री दहानंतरही सुरू होता. रात्री १० नंतर कार्यक्रम करण्यास न्यायालयाने मनाई केलेली असल्याने पोलिस निरीक्षकांनी रहमान यांचा शो बंद पाडला. तसेच रात्री दहानंतर तुम्ही कार्यक्रम कसा काय सुरू ठेवला, तुम्हाला नियम माहिती नाही का, असा सवाल पोलिसांनी रहमान यांना केला. रहमान यांनी निमूटपणे पोलिसांचे ऐकून घेतले आणि काहीही न बोलता शो थांबवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version