यंदाच्या गणेशोत्सवात अनेक शहरांमध्ये ‘डीजे’वर बंदी होती, पण पुण्यात मात्र डीजेचा दणदणाट सुरूच राहिला. पोलीस प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनंतरही अनेक विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडून डीजे वाजवण्यात आले. आता अशा डीजे मालकांवर लवकरच गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला परवानगी नाही. डीजेच्या दणदणाटामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि वृद्धांना मोठा त्रास होतो. उत्सवाच्या नावाखाली इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे पालन करून सण साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले