गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे मानाचे अन् प्रतिष्ठित मंडळांचे देखावे पुणेकरांचे लक्ष वेधताहेत!

मानाचे अन् प्रतिष्ठित मंडळांचे देखावे पुणेकरांचे लक्ष वेधताहेत!

लाडक्या गणरायाच्या आगमनाने पुणे शहर ‘गणेशमय’ झाले आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच पुणेकर बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. सायंकाळनंतर शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही गर्दी दिसून आली. रात्रीच्या जोरदार पावसातही गणेशभक्तांनी देखावे पाहण्याचा आनंद घेतला.

यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पौराणिक, जिवंत आणि पर्यावरणपूरक संदेश देणारे लक्षवेधी देखावे. पुण्याबाहेरील भाविकही खास करून हे देखावे पाहण्यासाठी येत आहेत. मानाच्या मंडळांपैकी तिसरा गणपती, गुरुजी तालीम मंडळाने यंदा वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे, जी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तब्बल १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असा मथुरेतील ‘वृंदावन’चा भव्य देखावा साकारला आहे, जो भाविकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरत आहे. याचबरोबर अखिल मंडई मंडळाने ‘कृष्णकुंज’ साकारून हलत्या झोपाळ्यावर शारदा गजाननाला विराजमान केले आहे. ही राजस्थानी शैलीतील सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची सुमारे १०० फूट उंचीची प्रतिकृती साकारली आहे. यात रामायण, कृष्णलीला आणि सप्तऋषींचे चित्रण करण्यात आले आहे. शहरातील ही मानाची आणि प्रतिष्ठित मंडळे आकर्षक देखाव्यांद्वारे पुणेकरांचे लक्ष वेधत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version