गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे हडपसर आणि खडकी टर्मिनल सज्ज, पुणे स्टेशनवरील गर्दीला दिलासा

हडपसर आणि खडकी टर्मिनल सज्ज, पुणे स्टेशनवरील गर्दीला दिलासा

पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी पर्याय म्हणून हडपसर आणि खडकी या दोन टर्मिनल स्थानकांचा विकास सुरू असून, ही दोन्ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत दोन्ही टर्मिनल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छट पूजेसाठी येथे विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे.

सणांच्या काळात पुण्यातून एक हजार विशेष रेल्वे फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६५ फेऱ्या या हडपसर आणि खडकी स्थानकावरून सुटणार आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या दररोज १५० पेक्षा जास्त ट्रेन चालतात आणि सुमारे १.७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी या दोन टर्मिनलचा विकास करण्यात आला आहे.

हडपसर स्थानकावर चार प्लॅटफॉर्म आणि खडकी येथे तीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. नवीन प्लॅटफॉर्मची मुख्य मार्गाशी जोडणी पूर्ण झाली असून, आता या दोन्ही ठिकाणांहून विशेष गाड्या सोडून चाचणी सुरू करण्यात आली आहे. चाचणीदरम्यान त्रुटी आढळल्यास त्यावर पुढील काही महिन्यांत उपाययोजना केली जाणार आहे.

दिवाळी आणि छटपूजेच्या काळात रेल्वे प्रशासनाने २५ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या एकूण १००० फेऱ्या असतील. हडपसर टर्मिनलवरून पाच शहरांसाठी आणि खडकीवरून दोन शहरांसाठी गाड्या धावणार आहेत. या दोन्ही स्थानकांवरून मिळणाऱ्या १७५ फेऱ्यांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी आणि ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version