गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गावर मेट्रोचा जोरदार वापर

वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गावर मेट्रोचा जोरदार वापर

पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांत प्रवासी संख्या २४ लाखांनी वाढून सप्टेंबरमध्ये ७५ लाखांवर पोहोचली आहे. वाहतूक कोंडी, पीएमपी तिकीट दरवाढ आणि पावसामुळे नागरिक मेट्रोकडे वळले आहेत. यामुळे शहरातील मेट्रो सेवांचा वापर प्रत्येक महिन्यात वाढत असून सप्टेंबरमध्ये पाऊण कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

महामेट्रो’ने वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू केली आहे. मार्चपासून प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे, पण जून महिन्यापासून वाढ वेगाने झाली. पावसामुळे, तिकीट दरवाढ आणि शहरातील कोंडीमुळे प्रवासी मेट्रोकडे वळले आहेत. गणेशोत्सवातही प्रवासी संख्येत अनेक उच्चांक पाहायला मिळाले, विशेषतः विसर्जनाच्या दिवशी सर्वाधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोला ११ कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मार्च महिन्यात पुणे मेट्रोत ४५ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. मे महिन्यात प्रवासी संख्या ४७ लाखांवर पोहोचली, जुलैमध्ये ५९ लाखांवर आणि ऑगस्टमध्ये ६९ लाखांच्या पुढे गेली. सप्टेंबरमध्ये प्रवासी संख्या पाऊण कोटींवर धडकली असून, गेल्या चार महिन्यांत मेट्रोची प्रवासी संख्या २४ लाखांनी वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाची प्रवासी संख्या ऑगस्टमध्ये वाढली होती, परंतु सप्टेंबरमध्ये थोडी घट दिसली. मात्र, वनाझ ते रामवाडी मार्गाची प्रवासी संख्या सव्वा लाखांहून अधिक झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version