गोल पोस्ट गुन्हा बुलढाण्यातून अटक; आठ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, आंदेकर टोळीला मोठा दणका!

बुलढाण्यातून अटक; आठ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, आंदेकर टोळीला मोठा दणका!

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी १९ वर्षीय आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह चार जणांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेहकर परिसरात महामार्गावर सापळा रचून बंडू आंदेकर (६८), स्वराज वाडेकर (२२), वृंदावनी वाडेकर (४०) आणि तुषार वाडेकर (२६) यांना अटक केली. याआधीच पोलिसांनी अमन युसूफ पठाण, सुजल राहुल मेरगू, अमित प्रकाश पाटोळे आणि यश सिद्धेश्वर पाटील या चौघांना पकडले होते. या आरोपींनी लक्ष्मी कॉम्प्लेक्सची रेकी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या खुनात सहभागी असलेले इतर काही आरोपी अद्याप फरार आहेत. अभिषेक उदयकांत आंदेकर, कृष्णा ऊर्फ कृष्णराज आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर आणि शिवम ऊर्फ शुभम आंदेकर यांचा समावेश या फरार आरोपींमध्ये आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक काम करत आहे.

या मोठ्या अटकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांनी जबरदस्त दणका दिला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version