गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे शरद पवारांची गाडी अडवली अन् विषय थेट फडणवीसांच्या कानावर घालायला सांगितला; पुण्यात...

शरद पवारांची गाडी अडवली अन् विषय थेट फडणवीसांच्या कानावर घालायला सांगितला; पुण्यात नेमकं काय घडलं?

शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कात्रज येथील रिंगरोड प्रकल्पामुळे प्रभावित नागरिकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रस्तावित रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या घरांबाबत त्यांनी आपली व्यथा मांडली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुणे दौऱ्यावर आले असता, कात्रज येथील गुजर निंबाळकर वाडी परिसरातील नियोजित कार्यक्रमाला जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांची गाडी थांबवली. नागरिकांनी आपली व्यथा मांडली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याची मागणी केली.

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या ८३ गावांना थेट जोडणारा सहा ते आठ लेनचा आधुनिक महामार्ग तयार होणार आहे.

रिंग रोड दोन टप्प्यांत विभागला आहे: आंतरिक रिंग रोड (PMRDA) आणि बाह्य रिंग रोड (MSRDC). बाह्य रिंग रोडसाठी डिसेंबर २०२४ मध्ये कामाला सुरुवात झाली असून सुमारे ७०–९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. आंतरिक रिंग रोडसाठी पहिल्या टप्प्यातील दहा गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाचा मार्ग कात्रजजवळील गुजर निंबाळकर वाडी भागातून जाणार असून यामुळे काही घरांना बाधा येणार आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की पूर्वी या भागातून रस्ता जाणार नसल्याचे त्यांना कळविण्यात आले होते, मात्र नव्या आराखड्यानुसार प्रस्तावित रस्ता थेट त्यांच्या घरांच्या जागेतून जाणार आहे. या परिसरातील सुमारे पंचवीस कुटुंबांनी महाराष्ट्राच्या विविध भागातून, काहींनी बारामतीहून येऊन येथे स्थायिक होऊन काही कोटी रुपयांचे बंगले उभे केले आहेत.

रहिवाशांनी शरद पवारांसमोर म्हटले, “आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आमची घरं उद्ध्वस्त झाली तर मोठं नुकसान होईल. आमची घरं वाचवण्यासाठी हा मार्ग बदलावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवावा.”

नागरिकांनी शरद पवारांना निवेदन दिले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि आवश्यक त्या पातळीवर लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. रिंग रोड प्रकल्पामुळे भविष्यात पुण्यातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असला, तरी ज्यांची घरं बाधित होत आहेत त्यांच्यात चिंतेचं वातावरण आहे. नागरिकांची मागणी आहे की शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version