गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची मोठी रस्सीखेच वाढू आपटी, वाजेवाडीच्या समावेशाने स्पर्धा...

जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची मोठी रस्सीखेच वाढू आपटी, वाजेवाडीच्या समावेशाने स्पर्धा तीव्र

पुणे जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, गट रचनेत वाढू आपटी आणि वाजेवाडी गावांचा समावेश झाल्यामुळे यंदा या गटातील निवडणूक स्पर्धा अधिकच उग्र झाली आहे.

सध्या येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी सरपंच प्रमोद पन्हाड, सतीश थिटे, सुभाष उमाप, नंदकुमार पिंगळे आणि सविता बगाटे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दुसरीकडे, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने माजी सदस्या जयश्री पलांडे, माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, मारुती शेळके, राजेंद्र रासकर आणि नंदकुमार गायकवाड यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तसेच, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून रवींद्र भोसले यांनीही दावा केला आहे.

अनेक इच्छुक ‘तिकीट मिळो की न मिळो, माघार घेणार नाही’ अशी ठाम भूमिका घेत असल्याने, वरिष्ठ नेत्यांवर उमेदवारी निश्चित करण्याची मोठी जबाबदारी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांनीही चाचपणी सुरू केली असून, आता खरी लढत आरक्षणानंतर स्पष्ट होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version