बहुचर्चित पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर वेगाने सुरुवात झाली आहे. एकूण सात गावांमधील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी, शुक्रवारी (दि. २६) तीन गावांतील सुमारे ७५ हेक्टर जमिनीची मोजणी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.
विमानतळासाठी सुमारे २ हजार ८१० एकर जमिनीच्या संपादनाला शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर ही प्रत्यक्ष मोजणी सुरू करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी पारगाव मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या सात गावांमधील ३ हजार एकरचे संपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या तीन गावांमध्ये मोजणीला सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे ही मोजणी वेगाने झाली असून, पुढील २५ दिवसांत संपूर्ण मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, कृषी आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पाच पथकांमार्फत ही मोजणी केली जात आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह चारपट मोबदला जाहीर केल्यामुळे सुमारे ९३ टक्के शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला संमती दर्शविली आहे. या प्रक्रियेमुळे आता विमानतळाचे काम लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे