गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिकच्या नांदगावात आढळला दुर्मिळ पांढऱ्या तोंडाचा कोब्रा

नाशिकच्या नांदगावात आढळला दुर्मिळ पांढऱ्या तोंडाचा कोब्रा

नांदगाव, नाशिक ७ डिसेंबर २०२३ : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील दहेगाव चौफुली परिसरातील शेतात एक पांढऱ्या तोंडाचा नाग आढळून आला. सर्पमित्रांनी या पांढऱ्या रंगाच्या कोब्राला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. या नागाची लांबी जवळपास चार फूट होती. नागाच्या तोंडाकडचा भाग फाटलेल्या अवस्थेत होता. तर तोंड आणि डोक्याचा भाग पूर्णपणे पांढरा होता.

याची माहिती मिळवण्यासाठी सर्पमित्र बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे छायाचित्र पाठवले असता त्यांनी मुंगसाने नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज वर्तवला. जखमी झाल्याने नागाला भक्ष्य पकडणे कठीण जात असुन अपुऱ्या पोषणामुळे त्याच्या शरीरातील ‘मेलनीन’चे प्रमाण कमी होऊन त्याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्याठिकाणी पांढरा रंग येत असावा असा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला आहे.

रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे शरीरातील ‘मेलॅनिन’ घटक कमी होऊन त्वचा रंगहीन होते अथवा तिथे पांढरा रंग येतो. नागाच्या तोंडाचा भाग पूर्णपणे पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील त्वचा पांढरी झाली आहे. सर्पमित्र बडोदे यांनी या नागाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेऊन उपचार केले. नांदगाव वनविभागात नोंद करून नागाला तत्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version