नवी दिल्ली, २२ मे २०२३: देशातील दोन हजारांच्या नोटांचे निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर मंगळवार, २३ मेपासून या नोटा बँकेमधून बदलून घेता येईल. सध्या चलनात असलेल्या दोन हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे परत येतील, असे सांगत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सांगितले आहे. तसेच नोटबंदीनंतर नोटांची उणीव कमी करण्यासाठी काढण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाचा उद्देश पूर्ण झाल्याच्या दावाही त्यांनी केला आहे.
नोट बदलून घेण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या सर्व तांत्रिक समस्यांना बँकेकडून संवेदनशीलपणे विचार केला जाईल. या नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय बँकेच्या चलन व्यवस्थापन कार्याचा एक भाग असून तो स्वच्छ नोट धोरणाशी सुसंगत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये कधीही या नोटा बदलून घेता येणार असल्याने नागरिकांनी बँकेमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन दास यांनी केले आहे.
नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली. एक विशिष्ट वेळ दिल्याशिवाय, प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही, असे सांगत बँकांकडे इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर