गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई, ५ सप्टेंबर २०२१: टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल येथे केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही, मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले? काय करायला हवे? याची  अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल असेही   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले,मदत केली म्हणून आज  आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय या संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version