गोल पोस्ट आरोग्य बातम्या रुग्णालय स्वच्छतेत क्रांती! रोज बदलेल बेडशीटचा ‘रंग’

रुग्णालय स्वच्छतेत क्रांती! रोज बदलेल बेडशीटचा ‘रंग’

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांमधील संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता शासकीय रुग्णालयांमध्ये ‘यांत्रिक निर्जंतुक धुलाई’ (Mechanical Sterile Laundry) प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या उपक्रमानुसार, प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळ्या वारांसाठी स्वतंत्र रंगांच्या बेडशीट्सचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे बेडशीट पाहूनच ती आजच बदललेली आणि स्वच्छ आहे की नाही, हे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने समजेल.

या अत्याधुनिक प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुग्णालयीन वस्त्रांची धुलाई प्रक्रिया पूर्णपणे यांत्रिक, स्वयंचलित आणि निर्जंतुक पद्धतीने होईल. उच्च तापमान आणि निर्जंतुकीकरण रसायनांच्या वापरामुळे कपड्यांवरील जंतू, विषाणू आणि दूषितता पूर्णपणे नष्ट होणार आहे. आरोग्य विभागाच्या मते, यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा वाढून संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

सध्या ही प्रणाली राज्यातील १४ जिल्हा रुग्णालयांसह उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये राबवली जाणार आहे. ‘स्वच्छ व सुरक्षित वस्त्रसामुग्रीमुळे रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि आरोग्यसेवा तुलनेने दर्जेदार बनतील,’ असे मत औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना जोशी यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या या आदर्श उपक्रमातून प्रेरणा घेत, आता महापालिका रुग्णालयांतही लवकरात लवकर ही ‘यांत्रिक निर्जंतुक धुलाई’ प्रणाली लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका रुग्णालयात संसर्ग नियंत्रण आणि स्वच्छतेचा हा उच्च दर्जा राखणे अत्यावश्यक बनले आहे.

यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version