गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत, जयंत पाटलांवरही तोच प्रयत्न सुरू असल्याचा शरद...

ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत, जयंत पाटलांवरही तोच प्रयत्न सुरू असल्याचा शरद पवारांचा गौप्यस्फोट

पुणे, १४ ऑगस्ट २०२३ : राज्याच्या विकासासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रगतशील नेतृत्वमुळे आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असे अजित पवार गटाकडून वारंवार सांगितले जात आहे. तर, शरद पवार गटाकडून पक्षातील फुटीच्या कारणावर मौन पाळण्यात आले होते. शरद पवार यांनीही पक्षात फूट का पडली याचे कारण स्पष्ट केले नव्हते. ईडीच्या कारवायांच्या धाकानेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचे बोलले जात होते. त्यावर आज शरद पवार यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले आहे. ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. ते प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत होते.

जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचे कानावर आले आहे. सत्तेचा गैरवापर करून पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. त्यानंतर एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वत: तसेच उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतली आहे. आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसने त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्र सरकारवर टीका केली. मणिपूर हा विषय मणिपूरपर्यंत मर्यादित नाही. पूर्व पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट आहे. आम्ही संसदेत हा विषय मांडला. पण यावर चर्चा होऊ दिली नाही. आम्ही एका कलमाखाली चर्चेची मागणी केली. ती पूर्ण केली नाही. पंतप्रधान संसदेत मणिपूरवर बोलले. पण ते मणिपूरवर अत्यंत कमी वेळात बोलले. मणिपूरच्या लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती. ते काहीच दिसले नाही. त्यांच्या भाषणात त्याचा अभाव होता. त्यातून काही पदरात पडले नाही, असे ते म्हणाले.

मोदींवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, तुमच्या हातात नऊ वर्ष राज्य आहे. नऊ वर्षात तुम्ही काहीच केले नाही. तुम्ही ३० वर्षापूर्वी काय झाले हे सांगता. ३० वर्षापूर्वीचे वर्कींग आता संपले आहे. आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मणिपूरमध्ये भाजपचे राज्य आहे. काँग्रेसने चांगले काम केले नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला ९ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा संतप्त सवाल पवार यांनी केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version