गोल पोस्ट इतर राजकारण काँग्रेसची विरोधी पक्षनेते पदाची मागणी रास्त, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

काँग्रेसची विरोधी पक्षनेते पदाची मागणी रास्त, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई, ३ जुलै २०२३ : राज्यातील राजकीय समीकरण अशा पद्धतीने बदलतील याची कोणी कल्पनाही केली नसेल. भाजपने दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडले. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत इतिहास रचला. मात्र आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: मैदानात उतरल्याने पुन्हा एकदा काही आश्चर्यकारक घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सोमवारी कराडमधील प्रीती संगमावर जात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ज्या पक्षाकडे सदस्य संख्या जास्त आहे त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार आता विधानसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता या पदासाठी त्यांनी मागणी केली असेल तर ती मागणी रास्त असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी अजित पवारांना फटकारले आहे. आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही, कुणालाही अपात्र करणार नसून मी त्या रस्त्यानेच जाणार नसल्याचे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. आज देशात भाजपच्या माध्यमातून समाजात जातीजातीत, धर्माधर्मात एक प्रकारचे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेसाठी प्रयत्न करणे ही आमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितल्यानुसार शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाहीतर राष्ट्रवादीच्या प्रतोदपदीसुद्धा जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version