गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे शहराच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक ‘स्मार्ट टॉयलेट’

पुणे शहराच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक ‘स्मार्ट टॉयलेट’

State-of-the-art ‘Smart Toilets’ at the entry points of Pune city.

पुणेकरांनो, आता प्रवासादरम्यान स्वच्छतेसह आरामाचीही मेजवानी मिळणार आहे! नागपूरच्या यशस्वी मॉडेलनंतर पुण्यातही अत्याधुनिक आणि वातानुकूलित ‘स्मार्ट टॉयलेट’ उभारले जाणार आहेत. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यामागे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचा थेट सहभाग असून, पुणे महानगरपालिकेने या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल ₹४.३१ कोटींची तरतूद केली आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी – सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, स्वारगेट बसस्थानक, बालेवाडी, कात्रज चौक आणि नगर रस्त्यावरील वाघोली – ही व्हीआयपी स्वच्छतागृहे उभारली जातील. प्रत्येक युनिटवर सुमारे ₹७० ते ₹७५ लाख खर्च अपेक्षित आहे. बालेवाडीतील टॉयलेटचे काम सुरू झाले असून, सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम यांनी दिली. वाघोली आणि शेवाळेवाडी येथील प्रकल्पांना लवकरच स्थायी समितीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ही स्वच्छतागृहे केवळ साधी नसून, प्रिमियम सोयी-सुविधांनी परिपूर्ण असतील – एसीची थंडगार सोय, आंघोळीकरिता सुसज्ज बाथरूम, चेंजिंग रूम, महिला, पुरुष आणि तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र विभाग, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ रचना. याशिवाय, प्रवाशांना मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स आणि मोफत वायफायचाही लाभ घेता येईल.

पालिकेने सुरक्षा व सुलभता या दोन्ही बाबींना विशेष महत्त्व दिले असून, प्रवासी, पर्यटक आणि पुणेकरांसाठी ही सुविधा शहराच्या स्वागताचे नवे प्रतीक ठरणार आहे.

– न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version