गोल पोस्ट इतर राजकारण राज्यात दुष्काळ जाहीर करा, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारला मागणी

राज्यात दुष्काळ जाहीर करा, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारला मागणी

पुणे, २४ ऑगस्ट २०२३ : राज्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस पडताना दिसत नाही. हातची पीकं वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. आता ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही, यासंदर्भातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

सुप्रिया सुळेंच ट्वीट-
महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. राज्यात १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. पावसाअभावी शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे.

हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक असल्याची सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा असे त्या म्हणाल्या. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळाची कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version