गोल पोस्ट क्रीडा कबड्डी खेळाडूंबद्दल बोलू काही – कबड्डी

खेळाडूंबद्दल बोलू काही – कबड्डी

कबड्डी.. रांगड्या मातीचा रांगडा खेळ… तसेच या खेळाचे खेळाडू ही असतात अस्सल फौलदी. अश्याच एका महाराष्ट्राच्या खेळाडू बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

गिरीश मारुती एर्नाक, नावात जोर तसच मैदानावर ही दमखम. कबड्डी खेळात कल्याण सारख्या महाराष्ट्राच्या छोट्या शहरातून आलेला खेळाडू. या खेळाडूने भारतीय संघाला जागतिक पातळीवर कबड्डी खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिली. चला तर बोलू ,या खेळाडूबद्दल काही….

गिरीश एर्नाकचा जन्म २२ डिसेंबर १९९२ ला झाला. अगदी लहान वया पासूनच गिरीश कबड्डी खेळाकडे आकर्षित होता. जसं एखादी वास्तू बांधतांना पायाभरणी करणे गरजेचे असते. तसेच खेळाडूला प्रोत्साहनाची गरज असते. प्रत्येक खेळाडूचा पहिला गुरू हा शाळेतूनच असतो. होय प्रत्येकाच्या शाळेत क्रीडा शिक्षक असतातच तेच आपल्याला खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आंतरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेत असतात. तसेच गिरीश एरणाकला सुद्धा वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या क्रीडा शिक्षक सुनील कोळी सर यांनी प्रोत्साहित केलं या क्रीडा प्रकारामध्ये आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी .

एकदा सुरुवात केली की पुन्हा माघार घ्यायची नसते. हाच निश्चय करून गिरीश एर्नाक पुढे निघाला. प्रोफेशनल कबड्डी खेळायची असेल तर क्लबची गरज असते. जिथे काहीतरी वेगळं आणि नियमित शिकायला मिळते. म्हणून सुनील कोळी सर यांनी त्याला ओम क्रीडा मंडळला जॉईन हो असे सांगितलं आणि गिरीशने ओम क्रीडा मंडळ हा कल्याणमध्ये असणारा क्लब जॉईन केला.

तिथे त्याला अनुभवी आणि राष्ट्रीय खेळाडूंकडून कबड्डीचे नव नवीन धडे शिकायला मिळाले. महाराष्ट्र ही कबड्डीची खाण आहे हे उगाच म्हंटले जात नाही. इथे उत्कृष्ठ असे खेळाडू जन्माला येत असतात. आपल्याला संघात स्थान मिळवायचे असेल आपल्याला आधी स्वतः ला दुसऱ्या खेळाडूंपैक्षा श्रेष्ठ ठरवून मागे टाकावे लागते.

खेळात उंच भरारी घ्यायची असेल तर आधी जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय मग राष्ट्रीय पातळीवर निवड होऊन खेळाडूला आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळवून देता येतो. गिरीशने ही खूप मेहनत घेतली आहे. आधी शालेय स्तरावर यश मिळवून मग तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि मग राज्यस्तरीय स्पर्धा मग कुठे जाऊन राष्ट्रीय पातळीवर खेळायला संधी मिळते.

कबड्डी साठी शरीराला नियमित व्यायाम आणि डाएटची गरज असते. तसेच गिरीश हा ओम क्रीडा मंडळ पासून थोड्या दूर राहत असे. त्यामुळे रोज येणं जाणं करणं कठीण जात असे.

परंतु त्याने हार नाही मानली आणि कबड्डी स्पर्धा जिंकून येणाऱ्या पैश्यातून त्याने एक जुन्यातली सायकल विकत घेतली. मनात ध्येय असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही हे या गोष्टीचे जिवंत उदाहरण आहे. गिरीश ने ठाणे संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच महाराष्ट्राला २८ वर्षा नंतर राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवून देण्यात गिरीशचा खूप मोठा मोलाचा वाटा होता.

गिरीशला संधी मिळाली प्रो कबड्डी २०१५ च्या हंगामात पटणा पायरेट्स या संघा कढून खेळण्याची. भारतीय संघाचे कप्तान आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू राकेश कुमार यांनी त्याला आपल्या संघात खेळण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनतर २०१६ मध्ये त्याला बंगाल वॉरियर्स या संघाने आपल्या संघात सामिल केले आणि शेवटी २०१७ पासून ते आतापर्यंत गिरीश पुणेरी पलटण या संघात प्रमुख भूमिका बजावत आहे.

गिरीश म्हणतो मला पुणेरी पलटण या संघात खेळताना जास्त आनंद होतो कारण पुणे हा महाराष्ट्राचा संघ आहे. पाठीवर महाराष्ट्र असेल तर खेळात जोर येतो. गिरीश मारुती एरणाकची ओळख उत्कृष्ट डावा कोपरा अशी आहे. भारतीय संघातून खेळताना सुद्धा सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर या उत्कृष्ट जोडीची चांगली साजेदारी होत असताना. एक संधी गिरीशला मिळाली आणि त्या संधीचे त्याने सोने केले. दुबई येथे झालेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात गिरीशने मोलाची भूमिका बजावली. तसेच आशियाई स्पर्धांमध्ये त्याचा खेळ चांगला होता.

तसेच गिरीश एर्नाकला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा…

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावर‌ॆ

error: Content is protected !!
Exit mobile version