गोल पोस्ट इतर राजकारण धनुष्यबाण’ मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही- एकनाथ खडसे

धनुष्यबाण’ मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही- एकनाथ खडसे

जळगाव, १० ऑक्टोंबर २०२२ : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर भाष्य केले.

धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही असे खडसे म्हणाले. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील.

पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा असे म्हणत एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केले.

बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेच्या वाढीसाठी घालवलं होतं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे असं खडसे यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version