नवी दिल्ली, दि.१२ मे २०२० : कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने १.७९ लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. भारताला आत्मनिर्भर करणे हे एकच उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याशिवाय गुलामगिरीतील भारत आता विकासाकडे निघाला आहे. या प्रवासातही भारताने विश्व कल्याणाचा मार्ग अवलंबला असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. जगात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी भारतीयांची गरज लागेल, त्या गोष्टींसाठी भारत नेहमीच सज्ज राहील. यावेळी मोदी यांनी कच्छ येथे झालेल्या भूकंपाची आठवण करुन दिली.
संकटातून बाहेर पडायचा विचार केला तर आपण ते करुच शकतो याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी केला. या कोरोनाचे संकट जरी असले तरी थांबून चालणार नाही. अर्थ व्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वांनी उभारी घेणे गरजेचे आहे. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे.
आत्मनिर्भर भारताची निर्मिती ५ मजबूत घटकांवर अवलंबून असून अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता आणि मागणी हे ते घटक असल्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.
कोरोनावर मात करण्यासाठी चौथा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. मात्र तो नव्या रूपात असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले. येत्या १८ मे पर्यंत तो सर्वांपर्यंत पोहचवला जाईल.
याशिवाय हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत जगापुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला.
न्युज अनकट प्रतिनिधी: