गोल पोस्ट इतर राजकारण राज्यातील तीन इंजिनचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, बच्चू कडू यांचे भाकीत

राज्यातील तीन इंजिनचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, बच्चू कडू यांचे भाकीत

अमरावती, १२ जुलै २०२३ : राष्ट्रवादी मंत्र्यांच्या शपथविधीची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नसावी, असे स्पष्ट करत राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तीन इंजिनचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे भाकीत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.

बच्चू कडू म्हणाले की, पहिले ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना खाली टाकून दिले. यानंतर दुसऱ्यांना डोक्यावर घेतले आहे. असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरकारमधील प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेली वर्षभर केवळ मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा सुरू आहे, मात्र कोणतेही निर्णय झाले नाही. दुसऱ्यांदा झालेल्या शपथविधीवेळी आमचा विचार झाला नाही, अशी खंत व्यक्त करत राजकारणाला काही मर्यादा असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद नको, अशी माझी नाही तर शिवसेना(शिंदे गट) आमदारांची मागणी आहे, असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील सहभागावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version