गोल पोस्ट पिंपरी-चिंचवड न्यूज त्रिवेणीनगर पुनर्वसन ‘स्वप्न’ अपूर्ण, ‘समस्यांचा डोंगर’ कायम!

त्रिवेणीनगर पुनर्वसन ‘स्वप्न’ अपूर्ण, ‘समस्यांचा डोंगर’ कायम!

चिखली ९ ऑक्टोंबर २०२५ : त्रिवेणीनगर येथील शरदनगर आणि दुर्गानगर झोपडपट्टीतील सहाशे कुटुंबांना शरदनगर येथील भूखंडावर उभारलेल्या बारा मजली इमारतींमध्ये पुनर्वसित करून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे ‘स्वप्न’ दाखवण्यात आले. अंदाजे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य असलेल्या या प्रकल्पातील रहिवासी मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. पुनर्वसन झाले, पण समस्यांचा डोंगर कायम असल्याचे चित्र आहे.

पाणी, गळती आणि दर्जाहीन कामे रहिवासी हैराण

प्रकल्पातील कामाच्या दर्जाहीन गुणवत्तेमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. इमारती हस्तांतरित झाल्यापासून वरच्या मजल्यांवरील घरांमध्ये पावसाळ्यात पाण्याची गळती होते, ज्यामुळे त्यांचे हाल होतात. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा असून, तळमजल्यावर असलेल्या टाक्यांमुळे पाणी मैलामिश्रीत होण्याची भीती आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र असूनही पुनर्वापराचे पाणी दुर्गंधीयुक्त आहे. पार्किंग परिसरात मैलामिश्रीत पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची क्षमता कमी असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

अंगणवाडी, गाळे बंद सुरक्षिततेचा प्रश्न

तळमजल्यावर सुरू असलेल्या अंगणवाडीत लहान मुलांसाठी स्वच्छ शौचालयाची सोय नसल्याने कर्मचारी व मुलांची कुचंबणा होत आहे. या कष्टकरी व रोजंदारी करणाऱ्या नागरिकांना कचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत बाबींविषयी समुपदेशन करण्याची नितांत गरज आहे. याशिवाय अनेक ठिकाणी सेफ्टी ग्रील नसल्याने दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. तळमजल्यावरील अनेक गाळ्यांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि रस्ता नसल्याने ते बंद आहेत.

महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे!

विकसकाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सतीशकुमार खडके यांनी त्रुटी दूर करण्याचे आणि समुपदेशनाचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. मात्र, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुनर्वसनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version