गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे मुधोजी हायस्कूलचा १४ वर्षांखालील मुलींचा हॉकी संघ ठरला राज्यस्तरीय स्पर्धेचा मानकरी

मुधोजी हायस्कूलचा १४ वर्षांखालील मुलींचा हॉकी संघ ठरला राज्यस्तरीय स्पर्धेचा मानकरी

फलटण, २५ फेब्रुवारी २०२३ : अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकाविले.

या यशस्वी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, प्राचार्य बी. एम. गंगवणे, उपप्राचार्य ए. वाय. ननवरे, पर्यवेक्षक एस. एम. काळे, तुषार नाईक निंबाळकर व अमोल नाळे हे उपस्थित होते.

राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथे ता. १३ फेब्रुवारी ते ता. १५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा पहिला सामना कोल्हापूर विभाग विरुद्ध लातूर विभागा यांच्यात झाला. हा सामना कोल्हापूर विभागाने ५-० गोलने जिंकून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना नागपूर विभागाविरुद्ध झाला. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामाना ३-१ ने जिंकून कोल्हापूर विभाग (मुधोजी हायस्कूल) संघाने सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. या सामन्यात गोलकिपर म्हणून अनुष्का चव्हाण हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात शिफा मुलानी, निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे यांनी गोल नोंदविले. या स्पर्धेतील अंतिम सामना पुणे विभागाविरुद्ध झाला. हा सामना ६ -१ गोलने कोल्हापूर विभागाने एकतर्फी जिंकून सामन्याचे विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेमध्ये फॉरवर्ड लाईनमध्ये सिद्धी केंजळे, निकिता वेताळ, प्रणिता राऊत, श्रुतिका घाडगे, श्रद्धा यादव व वेदिका वाघमारे यांनी गोल नोंदविले. बचाव फळीमध्ये कुमारी श्रुती चव्हाण, शिफा मुलानी, तेजस्विनी कर्वे, मानसी पवार, अनुष्का सपाटे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या संघाची कर्णधार अनुष्का केंजळे हिने देखील उत्कृष्ट खेळ केला. या अगोदर १९८० ते १९८५ या काळामध्ये ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री. जे. एन. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या शालेय/ग्रामीण/महिला हॉकी संघाने राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे; तसेच याअगोदर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने २००९ मध्ये फलटण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. या यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ हॉकी क्रीडा मार्गदर्शक श्री. महेश खुटाळे, श्री. सचिन धुमाळ, श्री. बी. बी. खुरंगे, व कु. धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य; तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी. एम. गंगवणे, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

error: Content is protected !!
Exit mobile version