विमानतळ परिसरातील ‘गाथा लॉन्स’ येथे शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते बंडू खांदवे यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद रात्री ९ ते १० च्या दरम्यान झाला असून त्यानंतर बापू पठारे यांच्या ड्रायव्हरला खांदवे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
या ठिकाणी बापू पठारे यांना भेटायला गेलेला सचिन पठारे हाही मारहाणीचा बळी ठरला. पण लगेचच चर्चेला उधाण आलं — “हा सचिन पठारे म्हणजे भाजपचा कार्यकर्ता का?” कारण वडगावशेरीत सचिन पठारे नावाचे भाजपचे एक स्थानिक कार्यकर्तेही आहेत.
या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी भाजपचे सचिन पठारे यांनी स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यांनी सांगितलं,
“मला अनेक लोकांचे फोन आले की मला मारहाण झाली का? पण तसे काहीही झालेले नाही. मी गेली अनेक वर्षे जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये काम करतो. मी आणि माझी पत्नी सोनिया सचिन पठारे कमळाच्या चिन्हावरून प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे चुकीची माहिती पसरवू नका.”
दरम्यान, वडगावशेरी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटामधील अंतर्गत मतभेद आधीपासूनच आहेत. जगदीश मुळीक यांना मागील निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराजी होती. त्यामुळे आता पठारे–खांदवे वादानंतर नव्या राजकीय समीकरणांची कुजबुज सुरू झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील