पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेला मोठा कट भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळला आहे. आंबेगाव पठार येथे रेकी करत असलेल्या दत्ता बाळू काळे या संशयित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना त्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या.
चौकशीत त्याने सांगितले की, आंदेकर टोळीने त्याला आंदेकर यांच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी पाठवले होते. या कटात १९ जणांची टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याशिवाय, प्रतिस्पर्धी टोळीवर हल्ला करण्यासाठी पिस्तूल पुरवणाऱ्या गुन्हेगारालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे आणि पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा उपाय केला गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे