पुणे 5 फेब्रुवारी २०२५: अभिनेता वीर पहारिया सध्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाची चाहत्यांनी विशेष दखल घेतली आहे. मात्र, यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोलापूर येथील एका कॉमेडी शोमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे याने वीर पहारियावर विनोद केला. मात्र, हा विनोद चाहत्यांना रुचला नाही आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला.
प्रणित मोरेच्या विनोदावर संतापलेल्या वीर पहारियाच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली. एवढंच नव्हे, तर शो दरम्यानच काही चाहत्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर मोरेच्या समर्थकांनी संपूर्ण प्रसंग इंस्टाग्रामवर शेअर केला. सोशल मीडियावर हा विषय चांगलाच गाजू लागल्यानंतर अखेर वीर पहारियालाही यावर प्रतिक्रिया द्यावी लागली.
वीर पहारियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या हल्ल्याशी स्वतःचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, “हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे तो म्हणाला. यासोबतच, अशा प्रकारच्या घटनांना पाठीशी न घालण्याचे आवाहनही त्याने आपल्या चाहत्यांना केले.
सध्या सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आहे. वीर पहारियाच्या या प्रतिक्रियेनंतर परिस्थिती निवळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे
