गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘विकसित भारत बिल्डाथॉन’ मध्ये आयडियांचा महासंग्राम; जिंका १ कोटी रुपयांचे बक्षीस!

‘विकसित भारत बिल्डाथॉन’ मध्ये आयडियांचा महासंग्राम; जिंका १ कोटी रुपयांचे बक्षीस!

देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पंख देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘विकसित भारत बिल्डाथॉन’ या नाविन्यपूर्ण स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक विचार, सर्जनशीलता आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या ‘बिल्डाथॉन’मध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतच्या बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरणार आहे.

ही स्पर्धा म्हणजे तरुण संशोधकांसाठी आपल्या कल्पनांना मूर्त रूप देण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. स्पर्धेसाठी चार प्रमुख विषय (Themes) निश्चित करण्यात आले आहेत: शिक्षण, आरोग्य व पोषण, स्वच्छ ऊर्जा व पर्यावरण, आणि डिजिटल इंडिया व तंत्रज्ञान. विद्यार्थी यापैकी कोणत्याही एका ‘थीम’वर आधारित आपली कल्पक संकल्पना किंवा ‘प्रोटोटाइप’ सादर करू शकतात.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, ती ६ ऑक्टोबर पर्यंत https://vbb.mic.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर सुरू राहणार आहे. यानंतर, १३ ऑक्टोबर रोजी ‘लाइव्ह इनोव्हेशन इव्हेंट’ पार पडेल आणि त्यानंतर विद्यार्थी ३१ ऑक्टोबरपर्यंत आपली अंतिम संकल्पना सादर करतील. तज्ज्ञ मंडळे या प्रवेशिकांचे मूल्यांकन करून जानेवारी २०२६ मध्ये विजेत्यांची घोषणा करतील. या स्पर्धेत सहभागी होऊन देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांनी गमवू नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version