गोल पोस्ट क्रीडा कुस्तीपटूंचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित, कारवाई झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र...

कुस्तीपटूंचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित, कारवाई झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याच्या इशारा

नवी दिल्ली, ८ जून २०२३ : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या बैठकीत कुस्तीपटूंनी आपल्या पाच मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये ब्रिजभूषण यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. कुस्तीपटूंच्यावतीने बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते.

कुस्तीपटू आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यामध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली आहे. त्यानंतर साक्षी मलिकने आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन १५ जूनपर्यंत आंदोलन स्थगित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन पुन्हा तीव्र करणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले की, चर्चेदरम्यान सरकारने त्याच्याकडून १५ जूनपर्यंतची वेळ मागितली आहे. १५ जूनपर्यंत तपास करण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र पुनिया यांनी सांगितले की, सध्या तपास आणि इतर गोष्टी सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत.त्यामुळे १५ जूननंतर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलनाच्या विचारात आहोत. यावेळी काही मुद्यांवर सरकारशी बसून चौकशी करण्यात आली असल्याचेही पुनिया यांनी सांगितले. क्रीडा मंत्र्यांनी जे आज दाखवले ते आधीच त्यांनी करायला पाहिजे होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. २८ मे रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्यात येणार असल्याचे पुनिया यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, काल त्यांनी सरकारच्यावतीने कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज त्यांच्याबरोबर एक दीर्घ चर्चाही झाली आहे.ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करून १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यासोबतच खेळाडूंच्या राहिलेल्या मागण्यांचाही गांभीर्याने विचार केला जाणार असून त्याबाबत सरकार कडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खेळाडूंच्या भेटीनंतर सरकारकडून बोलताना त्यांनी सांगितले की, या सर्व गोष्टी खुलेपणाने केल्या आहेत. त्यामुळे ही बैठक सकारात्मक झाली असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version