उत्तमनगर परिसरात अवैध गावठी पिस्तुल हाताळताना चुकून गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना ४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सर्वांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात उघड झाले की, सागर कोठारी व पार्श्वनाथ चकोते या दोघांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्तुल आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यांनी ती शस्त्रं बेदरकारपणे हाताळत असताना अचानक गोळी सुटली. ती गोळी थेट संकेत मोहिते या २२ वर्षीय तरुणाच्या पायावर लागली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी संकेतला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोळी कशी लागली आणि पिस्तुल कोठून आले, याचा तपास करत असताना पोलिसांसमोर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका अल्पवयीन मुलावर खोटा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व अतुल क्षीरसागर यांच्या बारकाईने केलेल्या तपासातून हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाची विचारपूस करून सत्य परिस्थिती समोर आणली. या प्रकरणी संकेत मोहिते, सागर कोठारी, पार्श्वनाथ चकोते, जाफर शेख आणि वैभव धावडे या पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे, खोटे पुरावे सादर करणे आणि अल्पवयीन व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने गुंतविण्याचा समावेश आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलीस उप आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, पोलीस निरीक्षक धेंडे, पोलीस उपनिरीक्षक राजनारायण देशमुख, तसेच पोलीस अंमलदार गणेश हजारे, प्रदीप शेलार, परमेश्वर पाडळे आणि अजय पवार यांचा समावेश होता.
या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अवैध शस्त्रधारकांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पोलिसांकडून परिसरातील इतर संशयितांवरही लक्ष ठेवले जात असून, अवैध शस्त्रविक्रीच्या साखळीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – गणेश वढणे













































