गोंदिया शहरातील प्रत्येक गल्लीत बनवलेल्या स्पीड ब्रेकरचा चालकांना त्रास

गोंदिया, ८ जुलै २०२३ : रस्त्यांवर वाहतुकीचा वेग नियंत्रित ठेवावा आणि अपघात होऊ नयेत, यासाठीच रस्त्यांवर स्पीड ब्रेकर केले जातात. मात्र लोकांच्या सोयीसाठी बनवलेले हे स्पीड ब्रेकर कधी कधी त्रासदायक ठरतात. शहरात ठिकठिकाणी नियम धाब्यावर बसवून केलेले स्पीड ब्रेकर वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरले आहेत.

शाळा-कॉलेज, हॉस्पिटल, मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी, चौकाचौकात स्पीड ब्रेकर करणे गरजेचे आहे. मात्र शहरातील प्रत्येक रस्त्यावर स्पीड ब्रेकर असून ते नियमांकडे दुर्लक्ष करत बनवले आहेत असा आरोप नागरिक करतायत. स्पीड ब्रेकरची उंची, रुंदी यानुसार पॅरामीटर्स निश्चित केले जातात. मात्र शहरात उभारण्यात आलेल्या अनेक स्पीड ब्रेकर्सच्या संदर्भात या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासोबतच नियमानुसार दोन स्पीड ब्रेकरमध्ये अंतर ठेवावे लागते, तो नियमही मोडला गेला आहे.

काही ठिकाणी तर १०-२० फूट अंतरावरच स्पीड ब्रेकर करण्यात आले आहेत. तसेच उंच व रुंद स्पीड ब्रेकरमुळे याठिकाणी वाहने नेताना मोठी अडचण होते. काही वेळा वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या स्पीड ब्रेकर्समुळे पाठीचे आणि मानेचे आजार होऊ लागले आहेत. कधी कधी हे स्पीड ब्रेकर अजिबात दिसत नाहीत.

रात्रीच्या वेळी या स्पीड ब्रेकर्सवरून वाहने अचानक जातात तेव्हा वाहनचालकांनाही धक्का बसतो. त्यामुळे पाठीच्या समस्याही निर्माण होत आहेत. या स्पीड ब्रेकर्सवर रेडियमच्या पट्ट्या लावणे आवश्यक आहे. या सर्व परिस्थितीकडे नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच स्पीड ब्रेकर बनवताना नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा