जप्त मालमत्तेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास डीएसकेंचा विरोध

पुणे, २२ सप्टेंबर २०२३ : पोलिसांनी जप्त केलेली मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास बांधकाम व्यावसायिक दिपक सखाराम कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. ठेवीदारांकडून करण्यात आलेला अर्ज कायद्याच्या नजरेत सक्षम नसल्याने तो फेटाळण्यात यावा, असे लेखी म्हणणे डीएसके यांनी वकीलांमार्फत न्यायालयात सादर केले आहे.

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्या जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी ७१ मालमत्ता या डीएसके यांच्या भागीदार कंपन्यांच्या आहेत. त्यांचा लिलाव केला तर ठेवीदारांचे पैसे परत करण्याएवढे पैसे मिळतील. त्यामुळे या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणी मुंबईतील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात ठेवीदारांकडून वकील चंद्रकांत बिडकर यांनी केली आहे. ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही मालमत्ता एमपीआयडी कायद्यातील कलम सातनुसार मुक्त करण्यात येऊ नयेत, असे ठेवीदारांच्या वतीने अर्जात नमूद करण्यात आले आहे.

आतापर्यंत डीएसके यांच्या भागीदारी कंपन्यांच्या ३३५ स्थानांवर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या व खाजगी वापराची ४६ वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यातील १३ वाहनांचा लिलाव केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात नुकत्याच दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा