ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, अल्झायमरने होत्या आजारी

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव गत काही वर्षांपासून अल्झायमरने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील आपल्य राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्रीच्या निधनाने एका ज्येष्ठ कलाकाराला फिल्म इंडस्ट्री मुकली आहे.

गतवर्षीच त्यांचे पती आणि अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले होते. माहितीनुसार सीमा देव गेल्या काही वर्षापासून वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांना अल्झायमरही होता. आपला मुलगा अभिनव देव यांच्या वांद्रे स्थित निवासस्थानी त्या राहत होत्या. मुलगा अजिंक्य देव एक आघाडीचा अभिनेता आहे. तर अभिनव दिग्दर्शक आहे. मुंबईतील गिरगावात त्यांचे बालपण गेले. सीमा यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते.

जुन्या काळातही त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा या चंदेरी दुनियेत उमटवला. त्या संगीतकार आनंदजींच्या ऑर्केस्ट्रात गाणी गात होत्या. शालेय जिवनापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची छोटी परंतु संस्मरणीय ठरली. त्यांनी हिंदी-मराठी ८० चित्रपटांत भूमिका केल्या असुन यात आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा