बोपखेलमध्ये रंगणार ‘कबड्डी’चा महासंग्राम! ३६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा

पिंपरी-चिंचवडला मिळाला निवड चाचणी स्पर्धेचा मान, ५ नोव्हेंबरपासून थरार!

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ३६ वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा बुधवार, ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला या प्रतिष्ठेच्या निवड चाचणी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे, ज्यामुळे कबड्डीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. बाबूराव चांदेरे (कार्याध्यक्ष, राज्य कबड्डी असोसिएशन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेचा शुभारंभ किशोर गटातील परभणी विरुद्ध बीड, पिंपरी-चिंचवड विरुद्ध रायगड आणि रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व या सामन्यांनी होईल.

तर किशोरी गटात नाशिक शहर विरुद्ध ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड विरुद्ध नांदेड आणि परभणी विरुद्ध जळगाव हे सामने पहिल्या दिवशी रंगतदार ठरतील. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी विविध जिल्ह्यांतून राष्ट्रीय पंच बोपखेलमध्ये दाखल होणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेचा दिमाखदार समारोप २९ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबतच क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्ता भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडची क्रीडा संस्कृती या भव्य आयोजनामुळे अधिक समृद्ध होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे