भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ ‘डॉ. होमी भाभा’

भारताला अणू क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. भाभा यांचा जन्म सधन, सुशिक्षित पारशी कुटुंबात १० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. त्यांचे वडील बॅ.जहांगीर भाभा हे टाटा उद्योगसमूहाचे विधि सल्लागार होते. त्यांच्या आई मेहेरबाई या दिनशा पेटीट यांच्या नात. तर आत्या ही सर दोराब टाटा यांची पत्नी. बंगलोर येथे त्यांचे बालपण गेले.

संगीत, चित्रकला आणि क्रिकेटची विशेष आवड असणारे भाभा केंब्रिज विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
वयाच्या १५ व्या वर्षीच ते मुंबईतील शाळेतून सीनियर केम्ब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले.

होमी भाभा यांनी जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक असलेले व क्वाँटम थिअरीसाठी नोबेल पुरस्कारविजेते नील्सन बोर यांच्याबरोबरही काम केले. भाभा यांनी १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व १९४८ मध्ये अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना केली. भाभा यांना प्रतिष्ठित अ‍ॅडम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.१९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काने सन्मानित केले.

आपले संशोधन करतच डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भाभांनी या संस्थेसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून मोठ्या रकमेची देणगी मिळवून ‘कॉस्मिक रे रिसर्च युनिट’ सुरू केले. दरम्यान त्यांनी स्वतंत्र अण्वस्त्र संशोधन सुरू केले. त्यांच्याच पुढाकाराने मुंबईत भारत सरकारचे अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनची (अणुऊर्जा आयोग) स्थापना १९४८ रोजी केली. डॉ.भाभा या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. डॉक्टर होमी जहांगीर भाभा नसते तर अण्वस्त्र सज्ज संपन्न देशांच्या यादीत भारत समावेश झाला नसता. होमी भाभा यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताचा आण्विक तंत्रज्ञानात वचक आहे.

२४ जानेवारी १९६६ रोजी डॉ. होमी जहांगीर भाभा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये एका परिषदेसाठी जाताना फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामधील ‘मोब्ला’ येथे अपघात झाला. यात होमी भाभा यांच्यासह विमानातील सर्व ११७ प्रवाशांचा मृत्यू झाला.
भाभांच्या मृत्यूनंतर, विक्रम साराभाई अणुऊर्जा कमिशनचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव झाले. त्यांच्या स्मरणार्थ १२ जानेवारी १९६७ रोजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईतील अणूशक्तीनगर येथील अणु संशोधन केंद्राचे नामकरण होमी भाभा यांच्या नावावरून ‘भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर’ असे केले गेले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा