वृक्ष लागवडीबाबत पाशा पटेल करणार आत्मक्लेश आंदोलन

लातूर, दि.१६ मे २०२०: लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासोबतच पर्यावरण बदलामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असतानाही स्थानिक प्रशासनाकडून या निर्देशांना खो दिला जात आहे. शासनाचे निर्देश दुर्लक्षित करून प्रशासनाने अद्यापही वृक्षलागवडी बाबत कसल्याही हालचाली सुरू न केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पर्यावरण बदलामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला वारंवार दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी या जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात यासाठी पाशा पटेल यांनी ग्रामीण विकास तथा पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे मागणी केली होती. पर्यावरणातील बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर आहे.

त्यादृष्टीने केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलून स्थानिक प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. परंतु या विषयाचे गांभीर्य लक्षात न आल्याने स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही केंद्र शासनाच्या पत्रांची दखलही येथील यंत्रणेने घेतलेली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे शासनाचे धोरण आहे.याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माजी आमदार पाशा पटेल यांनी आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे पटेल यांनी कळविले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा