शपथविधी जन कल्याणाचा की स्व कल्याणाचा..?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लावून महिना होऊन गेला आहे. या महिनाभरात राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; एकाबाजूला राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असता दुसऱ्या बाजूला सत्तेच्या लोभापायी नेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल यासाठी या राजकारण्यांनी पूर्ण एक महिना सत्तास्थापनेसाठी घेतला. यादरम्यान त्यांना राज्यातील खोळंबलेली कामे आणि पावसामुळे झालेले नुकसान यांचा पूर्णपणे विसर पडला होता. एका बाजूला पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे बळीराजाच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा वाहत होत्या तर दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी चाललेल्या धावपळीमध्ये नेत्यांच्या घामाच्या धारा वाहत होत्या. मधल्या काळात प्रत्येक नेता झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्यभर फिरत होता; पण यामागे त्याला शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ हे कारण नव्हते तर शेतकऱ्यांचा नेता कोण हे दाखवण्या मध्ये त्यांच्या मध्ये चढाओढ लागली होती. जर त्यांना खरंच एवढी कळकळ असती तर प्रत्येकाने आपला स्वार्थ जागेवर ठेवून पहिल्याच दिवशी सत्ता स्थापन करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवली असती.
शिवसेना आणि भाजप हे धर्मावर स्थापन झालेल्या पक्ष आहे. धर्माचे भांडवलीकरण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे व त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणे हे या देशातले सर्वात मोठे राजकारण आहे. जिथे आपण म्हणतो सर्वधर्मसमभाव त्याच देशात असे गलिच्छ राजकारण केले जाते. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आहे जे विरोधी विचारसरणीचे आहेत. केवळ मुख्यमंत्री पद आपल्याकडे असावे या स्वार्थासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सोबत मिळाली. तर दुसर्‍या बाजूला मुख्यमंत्रीपद सलग आपल्याकडेच असावे असा हट्ट धरून बसलेला भाजप पक्ष होता. येथे हे सांगण्याचे कारण असे आहे की, समाजामध्ये जे नागरिक या पक्ष्यांशी निष्ठा ठेवतात त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की सत्तेसाठी हे नेते मंडळी काहीही करू शकतात ज्या मूलभूत तत्वांवर हे पक्ष स्थापन झाले आहेत ती मूलभूत तत्वे ही हे सोडू शकतात याचे हे सुंदर उदाहरण आहे. आतातरी लोकांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
आज सकाळी दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्व आमदार शपथ घेत आहेत. देवाला साक्ष मानून जनतेचे कल्याण करण्यासाठी हे नेते मंडळी शपथ घेत आहेत. या आधी महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक वेळेस शपथा घेण्यात आलेल्या मग आज पर्यंत सर्वसामान्य जनतेचे कल्याण का झालेले दिसत नाही? यांच्या शपथा ह्या सामान्यजनांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी च असतात का? कालपासून अनेक सोशल मीडिया माध्यमांवर वेगवेगळी छायाचित्रे आणि भावुक संदेश झळकत आहेत. या नेत्यांना निरनिराळ्या उपमा देऊन प्रत्येक जण हा माझा नेता अशा भावना व्यक्त करत आहेत. पण एका दृष्टिकोनातून बघितले तर हा त्यांचा भोळेपणा म्हणता येईल. याच भोळेपणा च्या आधारावर ही नेते मंडळी आज करोडो रुपयांचे धनी आहेत. गेले महिनाभर राज्यात झालेले शेतकऱ्यांचे हाल या नेत्यांनी तेवढ्याच भाऊकतेने बघितले का हा प्रश्न या कार्यकर्त्यांच्या मनात कधी आला नसावा.
सत्ता स्थापन करताना जी राजकीय समीकरणे जुळविण्यात आली आहेत यामध्ये जनतेचा कुठेही फायदा दिसून येत नाही. बारकाईने जर विचार केला तर शिवसेना आपली भाजप सोबतची युती सोडून सरकार स्थापन करत आहे. तेही केवळ मुख्यमंत्री पदासाठी. अशा परिस्थितीत शिवसेना केंद्रातून शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील समस्यांसाठी किती मदत आणू शकेल हा मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या सोबत तुम्ही युती तोडली आहे ते सरकार केंद्रामध्ये आहे व दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही राज्यात सरकार स्थापन करत आहात. दुसरीकडे भाजप मुख्यमंत्री पूर्ण ५ वर्ष आपलाच असावा म्हणून हट्ट धरून होता. केवळ मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्ष आपापसात भांडत होते. गेली पाच वर्ष सत्ता भोगत असलेला भाजप पक्ष अजूनही सत्तेच्या लोभा साठी वाटेल ती तडजोड करण्यास तयार होता. गेल्या पाच वर्षात आपण जनतेच्या किती समस्या सोडवू शकला याचे भाजपकडून कधी आत्मपरिक्षण केले गेले आहे का? राम मंदिर, कश्मीर मुद्दा आणि पाकिस्तानचा मुद्दा या गोष्टींवर जनता अवलंबून नसते. तो राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा आहे. भाजपने या तिन्ही मुद्द्यांचे या निवडणुकीत भरपूर राजकारण केले; परंतु २०१४ सली जो बहुमताचा जनादेश भाजपला मिळालेला होता त्याच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपला कमी यश आले आहे. याचा अर्थच असा होतो की लोकांच्या समस्यां पर्यंत पोहोचण्यात भाजप कुठे ना कुठे कमी पडले आहे. कदाचित पुढच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवणे देखील कठीण जाऊ शकते.
सरकार कोणाचेही असो जनतेला याचे काही घेणेदेणे नसते. सामान्य माणूस जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर सरकार कडून अपेक्षांचा डोंगर उभा असतो तर कोणत्याही नेत्याचा चेहरा नव्हे. हा माझा नेता मुख्यमंत्री असावा असा त्याचा हट्ट नसतो. हा हट्ट फक्त कार्यकर्त्यांचा असतो सामान्य माणसाला याच्याशी काही घेणेदेणे नसते. आज सर्व नेत्यांनी शपथा घेतल्या आहेत. या शपथा जनतेच्या कल्याणासाठी घेतल्या आहेत की स्वतःच्या कल्याणासाठी घेतल्या आहेत हे तो देवच जाणे ज्याची यांनी शपथ घेतली आहे. आज प्रसारमाध्यमांवर नेतेमंडळींचे चेहरे खुलून आल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण गळाभेट करून आनंद साजरा करत होता. हा आनंद पुढची पाच वर्ष मी सत्ता गाजवणारा यासाठी होता की पुढची पाच वर्ष मला जनतेसाठी काम करण्यास संधी मिळणार यासाठी होता? अजित पवार यांना एका वृत्तवाहिनी कडून प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही राजीनामा दिल्यानंतर जेव्हा घरी परतला तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला दिसत होता, तुम्ही पुन्हा कुटुंबात आला आहात याचा तो आनंद होता का? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राजकारण हा वेगळा भाग आहे आणि कुटुंब हा वेगळा भाग आहे आम्ही नेहमीच आनंदी असतो व हसून खेळून राहतो. या उत्तरातच सामान्य जनतेने समजून जावं की राजकारण हे जनतेसाठी असते बाकी राजकारणाच्या मागे सर्वकाही अलबेल आहे. मग सामान्य जनतेने तरी का पक्षनिष्ठा ठेवावी. या नेतेमंडळींकडून निष्ठा ठेवण्यापेक्षा समोर उभ्या असलेल्या समस्यांवर कार्याची अपेक्षा ठेवावी. शेवटी सामान्य लोकांच्या भावना या राजकारणातील सर्व मोठे भांडवल आहे. तुमच्या भावनांना भांडवल बनू देऊ नका.
या महिनाभरात सत्तास्थापनेत अनेक विचित्र घडामोडी समोर आल्या ज्यांची आपण अपेक्षाही ठेवली नव्हती. काल राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले की, भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रभावी विरोधी पक्षाचं काम करेल. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोचवून सोडवण्याचा प्रयत्न करेल. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू. मग गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस व त्यांचे सरकार राज्यात सत्ता गाजवत असताना ते जनतेचा आवाज का बनू शकले नाहीत? जनतेच्या समस्यांचे निवारी करण करण्यात ते मागे का राहिले? आत्ता प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जर भाजप काम करणार असेल तर मागील पाच वर्षात एक प्रभावी सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला काम करता आले असते. गेला महिनाभर भाजपने केवळ मुख्यमंत्री पदासाठी सत्ता स्थापनेस विलंब केला. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास भाजप पक्ष तयार झाला असता तर आतापर्यंत सत्ता स्थापन होऊन राज्यातील बऱ्याच समस्यांचे निवारी करण झाले असते; परंतु प्रश्न आहे तो सत्ता गाजवण्याचा व महत्त्वाची पदे मिळवण्याचा.
या घडामोडी फक्त सत्तेच्या लोभापायी झाल्या याची जाणीव सामान्य जनतेला झाली तर नक्कीच प्रत्येक सरकार समोर जनतेच्या समस्या सोडवण्या खेरीज दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. ही जाणीव सामान्य जनतेला तीव्रतेने होणे आवश्यक आहे. सरकार कोणाचेही असो कोणताही नेता असो जोपर्यंत सामान्य जनता यांना जाब विचारण्यास सुरुवात करणार नाही तोपर्यंत या सामान्य जनतेचे राजकीय दृष्टिकोनातून भांडवलीकरण होतच राहणार… असो मतदार राजा मतदान करून येताना बोटाला शाई जरूर लावली जाते परंतु या शाईचे रूपांतर चून्या मध्ये होऊ नये म्हणजे झाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा