शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा शिक्षक

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरामध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रीडा शिक्षकाने ९ वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ९ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर याच शाळेच्या क्रीडा शिक्षक नराधमाने बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपी शिक्षक शाम दिगंबर वारकड (वय४३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावरअंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुरनं.५४५,पोक्सो कायद्याचे कलम ४,६,८,१२ आणि भादवि ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास डिवायएसपी राहुल धस करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या क्रिडा शिक्षकाने मुलीला क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी दिवाळीपुर्वी जालना येथे नेले होते. क्रिडा स्पर्धेमधून परत आल्यानंतर त्या मुलीला अंबाजोगाई येथील शासकीय क्रिडा संकुल येथे १७/१०/२०१९ रोजी कार मध्ये बलात्कार केल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान या शिक्षकाने मुलीला ही घटना कोणाला सांगु नको असे धमकावले आहे. यानंतर मुलगी शाळेमध्ये भयभीत रहायची. ही बाब महिला शिक्षीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेवून सविस्तर विचारपुस केली.यानंतर मुलीने हा घडलेला धक्कादायक प्रकार शिक्षीकेला सांगितला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र शिक्षकाकडूनच अशी घटना घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या हया घृणास्पद प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेची मी तीव्र निंदा व खेद व्यक्त करते. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी                                                                                                                                  -पंकजा मुंडे,अध्यक्षा,गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान