शिक्षिकेने केले आठवीत शिकणाऱ्या मुलासोबत पलायन

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये एका धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एक २६ वर्षीय महिला शिक्षिका ८ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबतच पळून गेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत एका महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत असे म्हटले आहे की, अहमदाबाद येथील सरकारी शाळेतील एक २६ वर्षाची महिला शिक्षिका तिच्या १४ वर्षाच्या मुलाला घेऊन पळून गेली आहे. मुलाचे वडील हे येथील उद्योग भवनमध्ये काम करतात. त्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, ‘महिला शिक्षिकेने त्यांच्या मुलाला खूप भुलवलं. त्यानंतर तिने मुलाला स्वत:च्या जाळ्यात ओढलं आणि नंतर त्याला पळवून नेलं.’ सध्या हा मुलगा आठवीत शिकतो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्याचवेळी त्याची वर्ग शिक्षिका देखील बेपत्ता झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत अशी माहिती दिली की, महिला शिक्षिका ही जवळजवळ वर्षभरापासून आठवीतील मुलाच्या संपर्कात होती. ती इतर मुलांपेक्षा अधिकच त्याच्याजवळ होती. याबाबत नुकतीच शाळा प्रशासनाला देखील माहिती मिळाली होती.
शिक्षिका आणि विद्यार्थ्यामधील हे नातं शाळेत चर्चेचा ठरला होता. जेव्हा याचा जास्तीत बोभाटा झाला तेव्हा शुक्रवारी हे दोघंही पळून गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, ही खूपच हैराण करुन सोडणारी घटना आहे की, एक महिला शिक्षिका आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळून गेली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम ३६३ च्या अंतर्गत गांधीनगरच्या कलोल शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, महिला शिक्षिका कलोल येथील दरबारी चॉल येथे राहणारी आहे.

मुलाच्या वडिलांनी अशी माहिती दिली की, ‘जेव्हा संध्याकाळी सात वाजता मी घरी पोहचलो तेव्हा मला माझा मुलगा घरी दिसला नाही. त्यावेळी माझ्या पत्नीने मला सांगितलं की, तो संध्याकाळी ४ वाजेपासून बेपत्ता आहे. त्यानंतर आम्ही त्याला शेजारी आणि नातेवाईकांकडे शोधलं. पण तो आम्हाला कुठेही सापडला नाही. यानंतर आम्ही त्या शिक्षिकेच्या घरी गेलो. पण तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की, शिक्षिका आणि आमचा मुलगा दोघंही तिथे नव्हते.’ याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, अद्यापपर्यंत दोघंही सापडू शकलेले नाही. कारण दोघंही आपल्यासोबत मोबाइल फोन देखील घेऊन गेलेले नाहीत. सध्या पोलीस या दोघांचाही कसून शोध घेत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा