शिल्पकलेतील जादूगार

पुणे २० डिसेंबर २०२५ : काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेल्या दहा महिन्यांपूर्वीच त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती. मालवणजवळील राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ही त्यांची अखेरची कलाकृती. त्यांच्या निधनाने शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास थांबला आहे.

राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. सुतार यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. शिल्पकलेला १९६० नंतर नवनवे फाटे फुटत गेले. त्यातील एक शाखा म्हणजे स्मारक-शिल्पे. ती शाखा मुख्यत: भावनेशी निगडित असल्याने त्या प्रकारच्या कलेस राजाश्रय व लोकाश्रय अधिक मिळाला. प्रचंड आकाराची शिल्पे हे सुतार यांचे वैशिष्ट्य. त्यांना केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून ‌‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार‌’ मिळाला, त्या वेळी त्यांचे वय ब्याण्णव होते! राम सुतार यांनी १९६० मध्ये स्टुडिओ थाटला. त्यानंतरची सहा दशके त्यांच्या हातातून अनेक शिल्पे घडली.

संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे पुतळे त्यांच्या कलेची साक्ष देत उभे आहेत. त्यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे घडवलेले आहेत. त्यांनीच रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकियोतील पुतळा घडवला आहे. परदेशातून कुणीही पाहुणे आले, तरी त्यांना राम सुतार यांनीच घडवलेले महात्मा गांधी यांचे अर्धपुतळे भेट म्हणून दिले जात. त्यांची शिल्पकला जगभरातील अनेक नेत्यांच्या घरात पोहचली आहे. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडवणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे वैशिष्ट्य. दिल्लीत राजीव गांधी यांची कामगिरी वर्णन करणारे भित्तिशिल्प; तसेच, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढ्यांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प राम सुतार यांच्या कल्पनेतून साकारले आहे.

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा तीन पिढ्यातील नेत्यांचे पुतळे त्यांनी घडवले आहेत. सत्ताधीशांशी चांगले संबंध असतानाही त्यांनी राजकारणापासून कायम अलिप्तता ठेवली. त्यांनी ते तिशीच्या आतबाहेर असताना (१९५२ ते ५८) आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनवण्याचे काम सरकारी नोकरीचा भाग म्हणून केले. स्मारकशिल्पांबाबतची त्यांची दृष्टी तेथे विकसित होत गेली. सुतार यांच्यावर महात्मा गांधीजींचा मोठा प्रभाव होता. धुळे जिल्ह्यात सुतार यांचा जन्म झाला. ते सात-आठ वर्षांचे असताना महात्मा गांधी गोंडूरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून विदेशी वस्तू जाळण्याचा कार्यक्रम होता. गर्दीत उभ्या असलेल्या राम सुतार यांच्यापाशी मखमलीची गोल टोपी होती. त्यांना कोणी तरी ती पण विदेशी असून होळीत टाकली पाहिजे असे सांगितले आणि तेथून त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी नकळत जोडला गेलेला ऋणानुबंध त्यांच्या शिल्पकलेला चालना देणारा ठरला.

सुतार हे विनोबा भावे यांच्या नित्य संपर्कात होते. सुतार यांचे मूर्तिकौशल्य हेरून चित्रकलेच्या शिक्षकांनी त्यांना महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर १९४८ मध्ये गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितला. त्यांना त्या पुतळ्यादाखल शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले. सुतार यांनी नंतर शेजारच्या गावात तशीच गांधी मूर्ती बनवून दिली. तेथे त्यांना तीनशे रुपये मिळाले. सुतार यांना त्यांच्या कारकिर्दीला महात्मा गांधी यांचा आशीर्वाद लाभला असेच वाटले. तेव्हापासून महात्मा गांधी यांचा पुतळा हा त्यांची खासियत बनून गेला. चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‌‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके‌’ (बालके हे या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे पंचेचाळीस फुटी शिल्प, हा त्यांच्या कलेतील ‌‘भारतीयते‌’चा आदर्श मानला जातो. त्यांनी गंगा आणि यमुना, हरिजन आणि गांधी अशी शिल्पेही त्याच प्रकारे घडवली आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि चीनी बनावटीचा सरदार पटेल यांचा पुतळा ही उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणारी तिन्ही स्मारकशिल्पे सुतार यांच्या मूळ कल्पनेतून उतरली आहेत.

सुतार यांनी १९४७ मध्ये बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला. सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच ५२२ फूट उंचीचा पुतळा साकारण्यात त्यांच्या शिल्पकलेची आणि कल्पकतेची कसोटी लागली. तो गुजरातमध्ये सरदार सरोवर येथे आहे. पुतळ्याचे भाग चीनमधील फौंड्रीत बनवण्यात आले. ते तेथून सरदार सरोवरच्या प्रकल्पस्थळी नेण्यात आले. ‘एल अँड टी’ कंपनीने प्रकल्पस्थळी काँक्रिटचा भव्य ब्लॉक बांधला. त्यातूनच वर जाणाऱ्या लिफ्टची सोय केली आणि ब्लॉकच्या बाजूने कास्टिंग केलेले भाग लावून वेल्डिंग केले गेले. त्यासाठी मोठमोठ्या क्रेन्सचा वापर केला गेला. पुतळ्याच्या सर्व भागांची पूर्वनियोजित पद्धतीने जुळणी झाली‌. कास्टिंग सुरू असताना सुतार प्रत्यक्ष उभे राहून पाहणी करत. त्या वेळी त्यांचे वय ९४ वर्षांचे होते. कारकिर्दीच्या गेल्या ६० वर्षांत त्यांनी दोनशेहून अधिक भव्य शिल्पे तयार केली. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचीही शिल्पे सुतार यांनी घडवली. त्यांनी आपल्या हातानं विदेशातील महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडविले आहेत. संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषणातील पुतळाही त्यांनी घडवला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे जगभरात भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीके म्हणून उभे राहिलेले आहेत.

बालपण अत्यंत कठीण संघर्षातून जात असताना सुतार यांच्यातील प्रतिभा त्यांचे गुरुजी श्रीराम जोशी यांनी हेरली. त्यांच्यामधील उद्योन्मुख कलाकार घडविण्यासाठी जोशी यांनी राम यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. जेजेमधून शिक्षण घेत असताना त्यांच्या उपजत असलेल्या प्रतिभेचा अधिक विकास झाला. नियमित शिक्षणात सुतार यांना रस नव्हता; परंतु सुतार जेजे स्कूलमध्ये सातत्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत राहिले आणि अभ्यासक्रमाच्या शेवटी त्यांना मॉडेलिंगसाठी प्रतिष्ठित असे मेयो सुवर्णपदक मिळवले. आयुष्यभर त्यांनी चित्रकला आणि मातीकाम कौशल्य शिकविणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता बाळगली. कारण, त्यांच्यामुळे त्यांना दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्व मिळवता आले. राम यांना कांस्य धातूच्या ओतकामाची अधिक आवड होती. शिल्पांना गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यानी काम केले. १९५९ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय, प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते; मात्र शिल्पकलेची जास्त आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्र करियर निवडणे पसंत केले.

पंडित नेहरू यांनी देखील त्यांचे कौतुक केले. गांधी सागर धरणावरील चंबळ स्मारक हे त्यांनी केलेले काम खूप चर्चेत आले होते. काँक्रीटच्या एकाच ठोकळ्यातून कोरलेली ही ४५ फूट उंच भव्य मूर्ती ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बंधुत्वाची प्रतिक मानली जाते. ही मूर्ती एक माता दोन मुलांसह असल्याचे पाहून तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरूदेखील खूश झाले होते. आनंदवनमधील महात्मा गांधी यांचा भव्य आकाराचा अर्धपुतळा ही त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृतींपैकी एक आहे. महात्मा गांधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत सरकारने रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस आणि काराकास यांसारख्या देशांना महात्मा गांधींचे अर्धपुतळे भेट म्हणून दिले आहेत.

त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी वडिलांच्या कलाकृती एकत्र प्रदर्शित करून ‘आनंदवन’ नावाचे एक विस्तीर्ण शिल्प उद्यान विकसित केले. त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिली आहे. अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि मायकेल एंजेलो यांच्या कौशल्याशीदेखील केली आहे. आज ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या भव्य शिल्पे तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते. शालेय जीवनात असताना त्यांनी पहिल्यांदा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे फोटो पाहिले होते, तेव्हापासून त्यांना जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची खूप इच्छा होती. गुजरातमधील साधू बेट येथील सरदार सरोवर धरणावर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ स्थापित झाल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झाले.

  • भागा वरखडे