शौर्याचा वारसा जपणारा, महाराष्ट्राची शान वाढवणारा! मोशीत साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

Pimpri-Chinchwad
शौर्याचा वारसा जपणारा, महाराष्ट्राची शान वाढवणारा!

भव्य स्मारकासाठी सुमारे ३२ कोटी ८४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Pimpri-Chinchwad:पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे. मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा कांस्य धातूचा भव्य पुतळा आकार घेत आहे. महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्टअखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्ली येथील कार्यशाळेत तयार झालेले पुतळ्याचे सुटे भाग आता मोशीत एकत्र केले जात आहेत. सध्या पुतळ्याचा छातीपर्यंतचा भाग पूर्ण झाला असून, लवकरच जिरेटोप बसवण्यात येणार आहे.

या भव्य स्मारकासाठी सुमारे ३२ कोटी ८४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. केवळ पुतळाच नाही, तर त्याच्या भोवती ४० फुटांचा देखणा चौथराही उभारण्यात आला आहे. हा चौथरा आणि पुतळ्याचा दर्शनी भाग चारही बाजूंनी दिसेल अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात तर भर पडेलच, पण पर्यटन उद्योगालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या स्मारकाची भव्यता केवळ पुतळ्यापुरती मर्यादित नाही. पुतळ्याभोवती मावळे आणि सैनिकांचे पुतळे, उंच ध्वजस्तंभ, आणि अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश योजना हे सारे या परिसराला एक अनोखी ओळख देतील. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित म्युरल्स, ऐतिहासिक साहित्य आणि शस्त्रांचे संग्रहालय हे देखील या ठिकाणी साकारले जाणार आहे. ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शंभूराजांचा जीवनपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे, हे केवळ स्मारक नसून, भावी पिढीला शौर्याचा आणि स्वाभिमानाचा वारसा देणारे प्रेरणास्थान ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे