पुणे : पीएमपीमध्ये १२ ते १५ वर्षांपासून रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या १ हजार ३७२ कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यांना नियुक्तिपत्रे देण्यास प्रारंभ होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सुटल्यामुळे कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केला.
८७७ वाहक, ३३५ चालक, वर्कशॉपमधील १४५ कर्मचारी आणि १५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले. हे सर्व कर्मचारी १२ वर्षांपासून रोजंदारीवर काम करत होते. सलग २४० दिवस काम केल्यावर एक दिवसाचा ब्रेक देऊन त्यांना पुन्हा नियुक्ती दिली जात होती. कायम सेवेत घेण्याच्या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटीबरोबरच वैद्यकीय सुविधाही त्यांना मिळणार आहेत.
‘पीएमपी’ च्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षा नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांनी याबाबतच्या प्रक्रियेत आठ महिन्यांपासून लक्ष घातले होते.
याबाबत पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे म्हणाले, “उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे अजित पवार यांनी स्वीकारल्यावर संघटनेचे शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा कायम नियुक्त्यांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी फोन करून प्रशासनाला आदेश दिले. त्यामुळे कायम नियुक्त्यांचा निर्णय झाला.” दरम्यान, दोन्ही महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कामगारांच्या प्रतिनिधींना नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.