राज्यात लॉकडाऊनच्या काळात १ लाख ५ हजार ५३२ गुन्ह्यांची नोंद

मुंबई, दि. १४ मे २०२०: राज्यात लॉकडाऊन चालू आहे. याला आता २ महिने होत आले आहेत. या दरम्यानच्या काळात पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनेक कारवाया कराव्या लागल्या. राज्यात कलम १८८ नुसार १ लाख ५ हजार ५३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी २० हजार ७२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या १२९६ वाहनांवर गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५७ हजार ४३० वाहने जप्त करण्यात आली आहे.

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ५ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या २१४ घटना समोर आल्या असून यातील ७६४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १०० नंबरवर आलेल्या ९० हजार ५५६ कॉल्सची योग्य दखल घेऊन त्या संलग्न कारवाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत ३ लाख ४७ हजार ५२२ पास वितरित करण्यात आली आहे. राज्यातील क्वारंटाईन व्यक्तींची एकूण संख्या २ लाख ९७ हजार २८२ इतकी आहे त्यातील क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या ६६८ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. राज्यात ३९६४ रिलिफ कॅम्प उभारण्यात आले असून त्यामध्ये जवळपास ३ लाख ८४ हजार १८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ८४ पोलीस अधिकारी, ७०९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबई ५, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ८ पोलीस वीरांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा