पश्चिम बंगाल, १ ऑगस्ट २०२२: पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये रविवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथे प्रवासी घेऊन जल्पेशकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला करंट लागल्याने १० जणांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पिकअप व्हॅनमध्ये २७ लोक होते. यापैकी १६ जणांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तर १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिकअप व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातून विद्युत प्रवाह संपूर्ण वाहनात पसरला.
मेखलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरला पुलावर ही घटना घडली. माताभंगाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा यांनी सांगितले की, आज रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पिकअप व्हॅनला करंट लागला आणि ही घटना घडली. जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे विद्युत प्रवाह पसरल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या वाहनात मागील बाजूस जनरेटर बसविण्यात आला होता.
जखमींना चांगरबांधा येथील रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी २७ पैकी १६ जणांना चांगल्या उपचारांसाठी जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तर १० जणांना मृत घोषित करण्यात आले. सर्व प्रवासी सीतालकुची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
एएसपी वर्मा यांनी सांगितले की, वाहन जप्त करण्यात आले आहे, मात्र चालक फरार झाला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे