नवी दिल्ली, 21 ऑक्टोंबर 2021: कोरोनाला पराभूत करण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत देश 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार आहे. गुरुवारी देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. 100 कोटी डोस पूर्ण झाल्यावर सरकारने उत्सवाची तयारीही केली आहे. राम मनोहर लोहिया, दिल्ली येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहतील.
दरम्यान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकांना लस घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की ज्यांना अजूनही लसीकरण झालेले नाही, त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे आणि देशाच्या या सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावे.
100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्यावर देशभरात उत्सवांची तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी, पीएम मोदी सकाळी साडेदहा वाजता आरएमएल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहतील. येथे ते आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशीही चर्चा करतील. याशिवाय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया कैलास खेर यांनी गायलेले गाणे आणि लाल किल्ल्यावरून ऑडिओ व्हिज्युअल फिल्म लाँच करणार आहेत. यासह, स्पाइसजेट 100 कोटींचा आकडा पार केल्यानंतर दिल्ली विमानतळावर एक विशेष प्रकारचे आउटर कवर ही जारी करेल. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंहही यावेळी उपस्थित असतील.
याआधी, मांडवीया यांनी असेही सांगितले होते की, देशात 100 कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण होताच विमान, जहाजे, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून लाऊडस्पीकरद्वारे याची घोषणा केली जाईल. या सर्वांव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्येही मोठ्या उत्सवांची तयारी केली जात आहे.
आपल्या देशात कोरोना विरुद्ध लसीकरणाची मोहीम या वर्षी 16 जानेवारीपासून सुरू झाली. मोहीम सुरू होऊन 278 दिवस उलटले आहेत. कोविन पोर्टलनुसार, बुधवारी संध्याकाळी 7.15 पर्यंत देशात 99.54 कोटी डोस दिले गेले आहेत. देशातील 70 टक्के प्रौढ लोकसंख्येला एक आणि 31 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत. केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की ज्या गावांमध्ये 100% लसीकरण झाले आहे, तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ पोस्टर आणि बॅनर लावावेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे