देशात १०,००० जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली, दि.३मे २०२० : देशभरात आतापर्यंत १० हजार १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी २६.५२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

देशभरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार ७७६ इतकी झाली असून आत्तापर्यंत १२२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर ३.२४ टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

देशामधील कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधीही १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जरी लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये आणि ऑरेंज झोन मधील काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. याशिवाय सामाजिक अंतर राखण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच काही विशेष रेल्वे गाड्या ही सोडण्यात आल्या.

बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, बाहेरून घरी आल्यावर हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन करण्यात आले आहे.  तसंच जिथे कोरोनाचा रुग्ण सापडतो तो भाग तातडीने सील करण्यात येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना विलीगकरण करण्याचा सल्लाही दिला जात आहे. सर्वतोपरी खबरदारी घेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.

जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. भारताने आतापर्यंत योग्य दिशेने पावले टाकून योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळेच ते शक्य झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा