बारामती, ७ जानेवारी २०२१: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून १००८ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. गावागावात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे पॅनल समोरासमोर असुन दोन ग्रामपंचायतींना निवडणुका बिनविरोध करण्यात यश आले आहे.
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पेटली असून यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने युवक निवडणूक मैदानात उतरले असून १७३ वॉर्ड साठी १ लाख ४२ हजार ५३ मतदार मतदान करणार असुन अनेक प्रस्थापितांना याचा फटका बसु शकतो. तालुक्यातील एकुण ५२ ग्रामपंचायती मधुन ५२६ जागांसाठी २११८ उमेदवारांनी अर्ज भरला होता.
(सोमवार दि.४) शेवटच्या दिवशी ९७० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून १००८ उमेदवार मैदानात आहेत. तर माळेगाव खुर्द व वाकी या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर पाहुणेवाडी मध्ये एक अर्ज राहिला असून त्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक ठिकाणी महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय असुन सध्या गाठीभेटी व घोंगडी बैठका सुरू असुन दुरंगी व तिरंगी लढती आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराची पद्धत बदलली असून फेसबुक, व्हाट्सप् या सोशल मीडियावर व्हिडीओ, ऑडिओ, जोरदार प्रचार सुरू आहे. तर अनेक ठिकाणी सिने कलाकार आणून मतदारांना आकर्षित केले जात आहे. १५ जानेवारी शुक्रवारी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.
कोरोना संसर्गाचा बिकट काळ व निवडणुकीत होणारे वाद व कटुता दर वेळचेच हे बंद करण्यासाठी विरोधी पॅनल बरोबर चर्चा करून गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव