पुणे, २ मार्च २०२३ : राज्यात आजपासून गुरुवार (ता. २ मार्च) दहावीची परीक्षा सुरू होत आहे. राज्य मंडळाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांच्या वतीने २ ते २५ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होत आहेत. राज्यातून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि ७ लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे; तसेच ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ७३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. माध्यमिक बोर्डाने बुधवारी (ता. १) यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून, सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली.
राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला. त्यामध्ये ८,४४,१६ मुले असून ७,३०,६२ मुली या परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा ६१ हजार ७०८ इतके कमी विद्यार्थी बसले. ही परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे, असे बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कॉपीबहाद्दरांवर करडी नजर असणार आहे.
सर्व विभागीय मंडळांतून परीक्षा देणार्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा विद्यार्थ्यांचा कल यामुळे विद्यार्थीसंख्या घटल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या.
गेल्या ५ वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे :
१) मार्च २०१९ : १६ लाख ९९ हजार ४६५
२) मार्च २०२० : १७ लाख ६५ हजार ८२९
३) मार्च २०२१ : १६ लाख ५८ हजार ६१४
४) मार्च २०२२ : १६ लाख ३८ हजार ९६४
५) मार्च २०२३ : १५ लाख ७७ हजार २५६