राज्यात अजून 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण

मुंबई, 22 डिसेंबर 2021: राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील आता ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. सोमवारी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्यानं काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, राज्यात काल 11 जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या 65 वर पोहचली आहे.

मंगळवारी देशात 16 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 216 इतकी झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. काल आढळून आलेल्या11 ओमिक्रान बाधितांमध्ये 8 जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळून आले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळलेल्या 65 ओमिक्रान बाधितांपैकी 34 जणांची आरटीपीसआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सूचनांचं पत्र पाठवण्यात आलं आहे . सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण घालण्यास सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा